कन्नड तालुक्यात पिके करपली

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : पावसाने ओढ दिल्याने कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक शेतांमध्ये उभी पिके करपू लागली आहेत.

उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सारिका भगत यांनी चिखलठाण, डोणगाव परिसरातील शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तहसीलदार भगत यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत पिकांची अवस्था, आणि आर्थिक अडचणी जाणून पावसाअभावी झालेले नुकसान घेतल्या. बियाणे, खते, औषधे व मशागतीवर मोठा खर्च करूनही पावसाने साथ न दिल्याने हातात काहीच उरणार नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. 

खरीप हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च, कर्जफेड आणि पुढील हंगामाची तयारी अवलंबून असल्याने नुकसान वाढल्यास आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. चिखलठाण - कुंजखेडा गटासह तालुक्यातील अनेक भागांत पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.